Sunday, 17 March 2013

Think Before taking Health Insurance


जीवन विमा केल्यानंतर सर्वात गरजेची वस्तू म्हणजे आरोग्य विमा होय. आरोग्य विमा काढता अनेकदा लोक कमी प्रीमियमला प्राधान्य देतात, परंतु यासोबत इतरही काही गोष्टी आहेत. ज्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे.

व्यवस्थापन

आरोग्य विमा ही सर्वांसाठी गरजेची तरतूद असल्यामुळे लोक जीवन विम्यानंतर मेडिक्लेम पॉलिसी काढण्याला प्राधान्य देतात. मेडिक्लेम पॉलिसींचे वाढते प्रस्थ पाहता घेताना जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे. आज मार्केटमध्ये मेडिक्लेम पॉलिसीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा पॉलिसी घेताना ग्राहकाचा गोंधळ उडतो. अशावेळी पॉलिसी घेताना ज्या गोष्टींवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे नेमक्या त्या दुर्लक्षित राहतात.

प्रीमियमचा गुंता

मेडिक्लेम घेताना अनेकजण प्रीमियम (हप्त्याचा) विचार करून पॉलिसी घेतात. येथेच सर्वात जास्त चुका होत असतात. प्रीमियम जेवढा कमी तेवढे जास्त चांगले ही समजूतच चुकीची आहे. आयुष्याशी निगडित एवढी महत्त्वाची गोष्ट घेताना फक्त पैशांच्या आधारे त्याची निवड करणे चुकीचे ठरते. पॉलिसी फायनल करताना यात कव्हर होणारे धोके, आजार, स्वत:च्या आणि कुटुंबाच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. एकदा आपल्या गरजा आणि धोक्यांचा आढावा घेऊन विचार केल्यानंतर हप्त्याचा विचार करणे सोपे जाते. फक्त हप्ता कमी आहे म्हणून एखादी पॉलिसी घेणे शहाणपणाचे ठरत नाही. प्रीमियम संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढत्या वयासोबत प्रीमियममध्ये होणारे बदल. वयासोबत हप्त्यात होणारे बदल जाणून घेणे गरजेचे ठरते. निवृत्तीनंतरही हप्ते भरावे लागणार असतील तर ते विना अडचण भरता येईल तेवढा हप्ता असेल याची काळजी घ्यावी. वयासोबत हप्त्याची रक्कम वाढत जाते तेव्हा अनेक वेळा हप्ते भरण्यास अडचणी येतात. म्हणून पॉलिसीची निवड करताना अशी पॉलिसी निवडावी की वाढत्या वयासोबत ती विना कटकट भरता येईल.

सरळ आणि आरामदायी

बहुतांशवेळी मेडिक्लेम काही अतिरिक्त सुविधांसोबत मिळतात. पॉलिसीसोबत मिळणार्‍या चमक -धमकवाल्या इतर गोष्टी टाळत आपल्या गरजेनुसार पॉलिसीची निवड करणे क्रमप्राप्त ठरते. इतर गोष्टी टाळाव्यात याचा अर्थ असा नव्हे की कमी गोष्टी कव्हर करणारी पॉलिसी घ्यावी. आरोग्य क्षेत्रात महागाई मोठय़ा वेगाने वाढत आहे. आज काही रुपयांमध्ये होणारा खर्च काही दिवसांनंतर लाखोत जाण्याची शक्यता आहे. आता किरकोळ वाटणारी तरतूद भविष्यात तुमची मोठी मदत करू शकतो. म्हणून जेवढा जास्त कव्हर घेता येईल तेवढा घेणे चांगला सौदा ठरू शकतो. तसेच भविष्यात हप्त्यात होणार्‍या वाढीचा सुद्धा विचार केला पाहिजे.

कंपनीचा इतिहास तपासा

मार्केटमध्ये मेडिक्लेम देणार्‍या कंपन्या विविध आकर्षक ऑफर देऊ करतात. कितीही पर्याय उपलब्ध असले तरी पॉलिसी घेताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे ठरते. पॉलिसीची निवड करताना चांगल्या जाणकार व्यक्तीकडून माहिती घेणे कधीही योग्य ठरते. त्याचप्रमाणे स्वत:ही पॉलिसीसंबंधित बाबींची माहिती घेतली पाहिजे. तुम्ही ज्या कंपनीची पॉलिसी घेत आहे त्या कंपनीचा पूर्वइतिहास तपासून पाहा. इंटरनेटच्या मदतीने पॉलिसीसंबंधित मते आणि तक्रारी उपलब्ध असतील तर अवश्य वाचा. कंपनीचा ग्राहकांना मिळणार्‍या वागणुकीचा अंदाज येईल. याच्या मदतीने कंपनीची सर्व माहिती मिळेल, असा दावा करता येणार नाही, पण निश्चितपणे ग्राहकांना कंपनीकडून मिळणार्‍या सेवांचा अंदाज येईल. बाजारात कंपनीची काय पत आहे याची माहिती घेऊन पॉलिसी घेण्याचा निर्णय घ्यावा.

No comments:

Post a Comment