Monday, 1 April 2013

Free yourself from Policy !!!




पॉलिसीमधून सुटका करून घेण्यासाठी सर्वसाधारणपणे तीन पर्याय आहेत-
1)    पुढचे हप्ते भरणे बंद करणे.
2)    पॉलिसी सरेंडर करणे.
3)    पॉलिसी पेड अप करणे.
याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यापूर्वी विमाधारकाला या तीन पर्यायांची तोंडओळख असणे गरजेचे आहे.
पॉलिसी घेतल्यावर काही काळानंतर हप्ते भरणे बंद केले तर ती बंद ‘लॅप्स’ होते. इन्शुरन्स कव्हर तर बंद होतेच, परंतु सरेंडर व्हॅल्यूही मिळत नाही. सर्वात जास्त नुकसानीची बाब म्हणजे विमाधारकाने त्या पॉलिसीसंदर्भात पूर्वी जे हप्ते भरून त्या रकमेवर आयकरामध्ये सूट मिळवली आहे ती सूट खारीज/रद्द केली जाते. सदर रक्कम त्या त्या वर्षाच्या करपात्र कमाईत जमा   करून त्यानुसार आयकराचा भरणा करावा लागतो. हा सर्वसाधारण नियम आहे. पॉलिसीच्या प्रकारानुसार त्यात थोडाफार फरक होऊ शकतो.
सरेंडर केलेल्या पॉलिसीच्या बाबतीत पूर्वी भरलेल्या हप्त्यांच्या रकमेवर आयकर भरावा लागत नाही. हाती आलेली पूर्ण रक्कम मॅच्युरिटी किंवा मृत्यूनंतर मिळालेल्या रकमेप्रमाणे मानली जाते. त्यातही एक उपनियम अहे. विम्याची रक्कम जर प्रीमियमच्या पाचपट किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच हाती आलेली रक्कम आयकरमुक्त असते. आता किती रक्कम परत मिळते त्याचा विचार करू या. सर्वसाधारण नियमानुसार पॉलिसीला तीन वर्षे होईपर्यंत ती सरेंडर करता येत नाही. त्यानंतर केली तर पहिल्या वर्षी भरलेला हप्ता परत मिळत नाही. त्यानंतर भरलेल्या एकूण हप्त्यांच्या 30 टक्के रक्कम परत मिळते.
थोडक्यात, तुमच्या भरलेल्या रकमेच्या 25 टक्केही परत मिळत नाही. यामध्येही पॉलिसीच्या प्रकारानुसार आणि कंपनीनुसार थोडाफार फरक होऊ शकतो. पॉलिसी ‘पेड अप’ करणे हा आणखी एक पर्याय. या प्रकारात पॉलिसी पेड अप करेपर्यंत विमाधारकाच्या नावे बोनस तर मिळतोच, परंतु त्याचबरोबर विम्याच्या रकमेचा काही भागही मिळतो. मात्र, ही सर्व जमा रक्कम विमाधारकाच्या मृत्यूनंतर किंवा पॉलिसीची टर्म संपल्यानंतरच प्राप्त होते.
उदाहरणार्थ 25 वर्षांच्या व्यक्तीने 10 लाखांची 10 वर्षांची एन्डाउमेंट पॉलिसी घेतली तर वार्षिक हप्ता पडतो 1,03,032 रुपये. पाच वर्षांनंतर ती पेडअप केली तर त्याने भरलेल्या हप्त्याची रक्कम होते 5,15,160 रु. त्याला. प्राप्त होणार्‍या एकूण रकमेमध्ये विमा रकमेचा भाग असतो 5 लाख रु. (10 वर्षांच्या 10 लाख विमा रकमेच्या 50 टक्के प्रमाणात) आणि त्याचबरोबर 5 वर्षांमध्ये जमा झालेल्या बोनसची रक्कम असते 1,70,000 रुपये. पॉलिसीची 10 वर्षांची टर्म पूर्ण होण्याअगोदर विमाधारकाचा मृत्यू झाला तर किंवा तसे घडले नाही तर 10 वर्षांची टर्म संपल्यानंतर ही 6,70,000 रु.ची रक्कम प्रत्यक्ष हातात पडते.
थोडक्यात, ही रक्कम विनापरतावा विमा कंपनीकडे जमा राहते. यामध्येही नुकसान आहेच. परंतु सरेंडरच्या तुलनेत हा पर्याय कमी नुकसानकारक आहे. अर्थात, प्रत्येक पॉलिसीमधील अटींनुसार या पर्यायांमध्ये प्रत्यक्षात किती नुकसान होण्याची शक्यता आहे त्याचे गणित मांडून योग्य तो निर्णय घेणे विमाधारकाच्या हिताचे आहे

No comments:

Post a Comment